हैप्पी मदर्स डे – द स्टोरी ऑफ माई!!

७ मे २०१६, आज जरा फारच उकडतंय. रात्रीचे ३ तरी वाजले असावेत. हळूच उठून बसलो. सगळीकडे किर्र अंधार आहे. खोलीतला कंदील कधीच विझला आहे. त्याभोवती उडणारे किडे समोरच्या भिंतीवर तर काही पांघरुणावर शांत विसावले आहेत.

‘मधुकुंज’ हि नागझिरातील माझी आवडती खोली. अगदी तलावाला लागून असलेलं शेवटचं कॉटेज. ‘हॉलिडे होम्स’ पासून दूर त्यामुळे इकडे रात्री ९ नंतर कोणी फिरकत नाही. बाकी वर्दळ असते रात्रभर इथे उदमांजरांची, हरणांची, अन त्यांच्या मागे कधी बिबट्याची. समोरच्या अशोकाच्या झाडावर माकडं निवांत पहुडलेली असतात. वटवाघूळं रात्रभर उडत असतात.

मला जंगलात फारशी गाढ झोप कधीच येत नाही. मग अंथरुणात पडून कानोसा घेत राहायचं कुठून काय आवाज येतोय त्याचा. रात्री शांत झालेलं जंगल तसं मग बऱ्याच गोष्टीतून बोलत असतं. अचानक समोरच्या उंच झाडावरून आलेला मत्स्य गरुडाचा आवाज तुमचा थरकाप उडवायला पुरेसा असतो. तलावाच्या काठाला जमलेले नर चितळ मादीला प्रणयसाद घालून जंगल पार दणाणून सोडतात. दूरवर रातव्याची चूक-चूक अखंडपणे चालू असते. काही काळ जातो आणि मग परत शांतता पसरते. अगदीच पाचोळ्यात जी खसखस सुरु असते ती असते चितळ्यांच्या चरण्याची किंवा एखादया उदमांजरांची.

आज बऱ्याच वेळ असाच बसून राहिलो. एव्हाना विदर्भातील उकाड्याची सवय झाली आहे पण आज काहीतरी विचित्र वातावरण आहे. लोटली गेलेली लाकडी खिडकी परत नीट उघडली. जरा बरं वाटलं. अंधारात चाचपत दारापर्यंत आलो. पायात चप्पल घातली आणि दार उघडून बाहेर आलो.

पुरेसा चंद्रप्रकाश नव्हता. अंधुकश्या प्रकाशात समोरचा नागझिरा तलाव एकदम धीरगंभीर वाटत होता. हजारो वर्ष समोर घडत असलेलं पाहत त्या घटनांना आपल्या उदरात सामावून गूढ गुपित बनवणारा हा तलाव मला खूप आवडतो. मधुकुंजच्या बाहेर एक पांढऱ्या चाफ्याचं डेरेदार झाड आहे आणि त्याच्या खाली बसायला एक मोठा दगड. त्यावर बसलो. असं एकटं बसलं कि समोरच्या तलावाच्या अन चाफ्याच्या सुगंधाच्या साक्षीने खोलवर दडलेली अनेक गुपित गोष्टी बाहेर येतात.

१९९७ चा उन्हाळा, नववीची वार्षिक परीक्षा आणि मग थेट गाठलेलं नागझिरा. जंगलात राहायचा माझा तो पहिला अनुभव. तेव्हा नागझिराच्या काही भागात पायी फिरता यायचं. मचाणावर दुपारपासून दिवस मावळे पर्यंत बसता यायचं.

सर्वप्रथम ‘वाघ’ पाहिला तो इथे नागझिरात. जर्द भगवा- पिवळा रंग, अंगावर काळे पट्टे, पिळदार शरीर, पाणीदार डोळे. काय रुबाब असतो त्याचा!! ह्या वाघाने मग पूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. जंगलाविषयी ओढ निर्माण केली. अरण्यवाचन वाढलं. निरीक्षण करायला शिकलो. निसर्गातील छोट्या छोट्या गोष्टीतून शिकत गेलो.

वाघांचं आयुष्य हे तसं पाहिलं तर खूप खडतर. १५-१६ वर्षांच्या आयुष्यात सगळ्याच बाबतीत त्यांना संघर्ष करावा लागतो. पहिली २ वर्ष आईच्या बरोबर सुरक्षित वावरताना पिल्लं जो काही आनंद उपभोगतात तेवढाच त्यांच्या नशिबी. पुढे स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी सुरु होते एक दीर्घ लढाई. त्यामुळे जंगलात वाघाची छोटी पिल्लं असतील तर मला खूप आवडतं. खूप खेळकर असतात ती. खरतरं हा खेळच त्यांना कणखर बनवत असतो येणाऱ्या दिवसात स्वतःला सिद्ध करण्यासाठी. ती दिवसभर हुंदडत असतात. आईने केलेल्या शिकारीवर ताव मारून मस्त ताणून देतात तिच्या कुशीत. आई त्यांना चाटते, त्यांचे लाड करते, आपल्या जिवापेक्षा जास्त जपते त्यांना. आईच शेवटी ती!!

आज सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोरून सरकत जात होत्या. काही स्पष्ट तर काही आजच्या चंद्रासारख्या अंधुक. १९९७ पासून सुरु झालेली जंगलयात्रा २०११-१२ पर्यंत येवून पोहचली. हे वर्ष नेहमीच आठवणीत राहील ते ‘माई’ (किंवा AMark/T२) ह्या वाघीण आणि तिच्या ‘जय अन विरु’ ह्या २ नर शावकांमुळे. तो एक काळ होता जेव्हा नागझिराला भेट देणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय वाढली. नागझिरा एकदम प्रकाशझोतात आलं. माई आणि जय-विरू इथे भेट देणाऱ्या लोकांच्या गळ्यातील ताईत बनले. घरातील एक सदस्य वाटू लागले.

जय – विरू मोठे झाले. भारतातील काही मोठ्या वाघांमध्ये गणना होयील इतके मोठे. माई पासून वेगळे होऊन त्यांना आता आपलं राज्यं स्थापित करायचं होतं अन त्या विरासतीला वाढवायचं होतं. दोन सख्खे भाऊ पण आता वेगवेगळ्या वाटांवर जाणार होते……….. आणि अचानक विरूच दिसणं बंद झालं. आज दिसेल, मग दिसेल अशी आशा बाळगत निसर्गप्रेमी वाट पाहत राहीले. काही सर्वे नुसार तो दुसऱ्या भागात निघून गेला. सत्य काही असेल परंतु विरू परत कधीच दिसला नाही.

इकडे जयला आपलं राज्यं तर मिळालं पण जोडीदार अभावी ते वाढवणं शक्य नव्हतं. मग तो निघाला जोडीदाराच्या शोधांत त्याच्या प्रिय नागझिराला सोडून. १३० किलोमीटरचा मोठा प्रवास करून तो पोहचला उमरेडला. वाघांच्या इतिहासात जे वाघ मोठा प्रवास करून दुसऱ्या भागात गेले त्यांपैकी हा एक प्रवास. जोडीदारासाठी!!

दोन्ही जय – विरू नागझिरातून निघून गेले. नागझिराला माई कडून अजून एका प्रजननाची अपेक्षा होती. २००३-०४ पासून ४ वेळा प्रजनन केलेल्या माई कडून आपण जास्तच अपेक्षा नव्हतो का ठेवत?

अचानक मत्स्य गरुडाचा मोठा आवाज आला. दगडावरून थोडा घसरलोच. तितक्यात समोर नागझिरावर एक तारा तुटला. पाण्यात त्याचे प्रतिबिंब उमटले जणू काही तो तारा नागझिराच्या पाण्यात बुडाला. विलक्षण सुंदर दृश्य होतं ते.

४ वाजून गेले असावेत. थोडा आराम करावा म्हणून खोलीकडे निघणार तोवर दूरवरून धोक्याचा इशारा देणारा सांबराचा आवाज आला. कदाचित माई असावी. शिकारीच्या शोधात. आता तिचं वयं झालंय. पण तिची जिद्द कायम आहे. जगण्याची एक अनामिक ऊर्जा असते.

माणसांना जश्या भाव भावनां असतात तश्याच त्या सर्व प्राण्यांना असतात. त्यामुळे माईला जेव्हा एकटं वाटत असेल तेव्हा ती सुद्धा येत असेल तळ्याच्या काठी. बघत असेल तुटणाऱ्या ताऱ्याना, तळयात दिसणाऱ्या आभाळाला, आठवत असेल तिचा जीवन प्रवास, तिची पिल्लं, तिचा जोडीदार, मागे पडलेले सगळे क्षण!!

 

आज ८ मे २०१६, मदर्स डे. मी हे लिहिताना आणि तुम्ही हे वाचताना माई आज ह्या जगात नाहीये. कालच ७ मे दुपारी ३ वाजता तिने प्राण सोडला. वाढलेलं वयं आणि शिकार करताना झालेली दुखापत ह्या मुळे ती गेली. कायमची.

नागझिरात पुन्हा एक सर्कॅल पूर्ण झालं. आता जेव्हा कधी नागझिराच्या काठावर बसेल तेव्हा माई तुझी आठवण आल्या शिवाय राहणार नाही!!

तुझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या पैकी एक,
– रोहन तावरे

Tags:

2 thoughts on “Story of A-Mark (Mai) Tigress of Nagzira Navegaon Tiger Reserve”

  1. Pankaj

    खुपच सुंदर!!!!. Pankaj Jibhakate. Rrsort Manager, Nagzira FDCM

  2. Very well put into words. Spontaneous! ग्रेटच हं!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *