कळपात माणूस धीट!!

संध्याकाळचे ५.३० वाजलेले. थंडीचे दिवस होते. उन्ह बरीचशी कललेली. आदित्य, विवेक आणि मी हातात Camera Trap आणि त्याला बांधायला लागणारी साखळी घेवून जंगलातल्या एका पायवाटेने चाललेलो. दिवसभराची कामं संपलेली. आज कोणत्याच Trap मध्ये काहीच फोटो मिळाले नव्हते. ८-१० किमी चालून पाय थकले होते. आता एका नाल्यात लावलेला शेवटचा Trap चेक करून तिथून जवळच उभ्या केलेल्या सुमो गाडीतून कॅम्पवर परतायचं होतं. छान अंघोळ करून चहाचे घोट घेत शेकोटीजवळ चांदणे पाहत बसायचं होतं.

आम्ही चालत होतो. दोन झाडांच्या मध्ये एका कोळ्याच्या जाळ्यावर मस्त सोनेरी प्रकाश पडला होता. खूप सुंदर दिसत होतं ते. माझ्या खिश्यात एक छोटा सोनीचा कॅमेरा होता. मी थांबलो. कॅमेरा Traps खाली ठेवले आणि जवळच्या कॅमेराने फोटो घ्यायला लागलो. वाटल एखादा व्हिडीओ सुद्धा घ्यावा. ह्या सर्व प्रकारात ५-६ मिनिटे गेली. आदित्य आणि विवेक बरेच पुढे निघून गेले. त्यांना भरभर चालण्याची खूप सवय.

आपण मागे पडलोय हे लक्ष्यात येताच मी फोटो सेशन बंद करून पटपट चालायला लागलो. थोडं अंतर गेलो आणि तो नाला लागला. पाणी पूर्ण आटलेलं. मऊ मातीचे ढिगारे. त्यावर सांबर, चितळ, गवे आणि रानडुक्करचे पायाचे असंख्य ठसे. कुठे काही जुने आणि काही दिवसापुर्वीचे वाघ -बिबट्याचे ठसे. नाल्यात उतरलो. मऊ भुसभुशीत माती. दोन्ही बाजूचे जंगल एकसारखं वाटू लागलं. आता कोणत्या दिशेला जावं? की ह्या दोघांना आवाज द्यावा?

वाटल उजव्या बाजूने जावं. चालू लागलो. मिनिटभर चाललो असेल. वाटल आपण चुकीच्या दिशेने चाललोय. एव्हाना उन्ह खूप कलली होती अन सुर्य मावळतीला होता. हवेत गारवा वाढलेला. नाल्याला लागून असलेली उंच झाडं अन आतलं जंगल आता अंधारायला लागलं होतं. जोरात चालायला (खरतरं पळायला) सुरुवात केली. नाल्याची दोन वळण पार केली अन वाटलं आपण खरचं रस्ता चुकलोय. हे दोघे ज्या दिशेने गेले त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने आपण आलोय.

‘ह्या भागात माणसावर आणि पाळीव प्राण्यावर सुंदरबन नंतर सर्वात जास्त वाघाचे हल्ले होतात’ – आदित्यने एकदा सांगितलेलं आठवलं. शिवाय बिबट्याचे ठसे तर रोजच पाहत आलोय. वाघापेक्ष्या जास्त फोटो Trap मध्ये ह्या बिबट्यांचे आलेत. वाटल जोरात आवाज द्यावा. पण अजून थोडा उजेड होता. परत उलटा फिरलो अन धावत सुटलो. धावताना विचार येत होते कि हि चुकीची दिशा तर नसेल? कदाचित जिथून वळालो त्याच्या थोडेच पुढे हे दोघे असतील.

पुन्हा जिथून नाल्यात उतरलो तिथे आलो. अन पुढे चालत राहिलो. दोन वळणच गेली असतील तर एका झाडावरून हनुमान लंगुरने मोठी उडी मारली अन तो समोरच्या दुसर्या झाडावर पसार झाला. मोठा आवाज आला. काळजात धस्स झालं. त्या फोटो सेशन बद्दल स्वतःचा राग यायला लागला. आता अंधार पडला तर झाडावर चढून बसू वगैरे विचार येवू लागले. अरे पण, बिबट्या अन अस्वल! अचानक पुढे नाल्यात वळणावर आदित्य आणि विवेक एका वठलेल्या झाडावर लावलेल्या कॅमेरा Trap पाशी काम करताना दिसले. जीवात जीव येणे यालाच म्हणतात. खूप जोरात आनंदाने ओरडू वाटलं. पायात बळ आलं. तिथे धावत पोहचलो.

‘अरे कुठे होतास?’ – विवेकने विचारलं.
‘काही नाही. सावकाश येत होतो. ह्या गूढ जंगलाचे आवाज ऐकत अन अनुभव घेत. – मी थाप मारली.
‘आम्हाला वाटल तू वाट चुकलास. आम्ही आता तुलाच शोधायला निघणार होतो.’- आदित्य माझ्याकडे पाहत किंचितसा हसला. त्याला कळल होतं.

‘चला, झालं आजचं काम’. आदित्य निघाला. मी त्या दोघांच्या मागे पटपट चालू लागलो. अगदी निमुटपणे. कातरवेळेच्या त्या गूढ जंगलातून, आटलेल्या नाल्यातून, गार पडलेल्या रेतीतून अन वाघ -बिबट्याचा ठस्यांवरून!!

Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *