सायकल

‘सायकल’, एक अशी गोष्ट जी तुमच्या बालपणाचा एक हिस्सा असते.

अनेक सुखद आठवणींचा अविभाज्य भाग असते. बाबांचा हात पकडून तुम्ही दुकानात उभ्या केलेल्या सायकल पाहायला जाता.

‘याला एक चांगली सायकल दाखवा’ या बाबांच्या वाक्याबरोबर तुमची कळी हळूच खुलते. तुम्ही मोठा झाल्याचा आव आणून, अनेक प्रश्न दुकानदाराला विचारता. हाताची घडी घालून बाबा तुम्हाला कौतुकाने पाहत असतात. तुमचं लक्ष आता फक्त सायकल वर असतं.

‘बाबा ही बघा ही चांगली आहे, ही घेऊ आपण’ म्हणे पर्यंत बाबांचा हात खिशात जातो. तुमच्या डोळ्यातील आनंद त्यांना खूप काही देऊन गेलेला असतो.

‘सायकल’ आता घरी येते. तिला हार घातला जातो, पूजा केली जाते. एक मोठा पेढा भरवत आई तुम्हाला ‘आता मला दुकानातून तू सगळ्या गोष्टी आणून द्यायच्या बरं’ म्हणत जवळ घेते.

उद्या तुम्ही याच सायकलवर शाळेत जाणार असता. सगळ्या मित्रांना तुमची नवी सायकल दाखवणार असता. ही कल्पना त्या रात्री तुम्हाला झोपू देत नाही. कधी एकदा सकाळ होतीये असं होतं.

‘सावकाश चालव. हात सोडून काही करामती करू नको’, अश्या अनेक सूचना ऐकत, तुम्ही घराबाहेर पडता. तुमच्या स्वतःच्या सायकलवर. घोड्यावर स्वार होऊन वाऱ्याला कापत निघालेल्या एका राजपुत्राप्रमाणे आज तुमचाही एक वेगळा थाट असतो.

सायकल तुमची सर्वात छान सखी होऊन जाते. मित्रांबरोबर रेस लावली जाते. एका दमात कित्येक मैल तुम्ही सहज सायकल चालवून येता. एक वेगळीच ऊर्जा असते ती. कधीही न थकवणारी, न थांबणारी.

मग अचानक एक वेळ येते, तुम्ही आता मोठे झालेले असता. शाळा संपते, तुम्ही कॉलेज मध्ये जाता. स्पर्धा जास्त तीव्र होते, वेळ कमी पडायला लागते. आणि सायकल जाऊन तुमच्या कडे बाईक येते.

आता ती सायकल जिन्याच्या खाली ठेऊन दिली जाते. त्यावर धूळ बसते. चाकांच्या तारा गंजतात, सीट जीर्ण होत जाते. कधीतरी गल्लीतील एखादं मांजर तिच्यावर येऊन पाय पसरून बसते. तितकेच काय तो तिचा ह्या जिवंत जगाशी संबंध येतो. बाकी तुम्ही तुमचा स्पीड पकडलेला असतो. डोळ्यावरचा चष्मा अजून जाड होतो. ह्या तरुण वयात तुम्ही थकून जाता. जिना धावत उतरला की श्वास फुलायला लागतो.

मग अजून काळ पुढे जातो. तुमचं शिक्षण संपून तुम्हाला जॉब लागतो. बाईक बरोबर आता एखादी कार सुध्दा दारात उभी राहते. सायकल आता एक सांगाडा झालेली असते. जिन्याखालची एक अडगळ यापलीकडे तिला काही किंमत नसते. दिवाळी येते, तुम्ही घर आवरायला घेता. जिन्याची खालची जागा सोडलं तर बाकीच सगळं घर लखलखीत होऊन जातं.

तोंडावर रुमाल बांधून तुम्ही त्या धुळीत खितपत पडलेली सायकल ओढून बाहेर काढता. सीटचे तुकडे तुमच्या पायाशी जमिनीवर गळून पडतात. स्टँड लागत नाही. बराच प्रयत्न करून तुम्ही तिला कशीबशी उभी करता. गलितगात्र झालेली तुमची ती लहानपणीची साथीदार खूप केविलवाणी दिसत असते आणि काळाच्या ह्या ओघात तुम्ही बरंच काही गमावलेलं असतं!!

Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *