काही ‘मूर्खपणा’ आयुष्यभर लक्ष्यात राहतो!!
दिवस ऑगस्ट महिन्यातला. नुब्रा एथेनिक कॅम्प मध्ये रात्रीचे १२ वाजले होते. प्रचंड थंडी होती. कॅम्पचे सगळे रायडर्स झोपी गेलेले. आकाश निरभ्र होते. टेंटच्या खिडकीतून डोकावले तर Royal Enfield बुलेट्स वर छान मंद उजेड पडला होता.
ऋचा थकून झोपी गेलेली. हळूच उठलो. कॅमेरा, Tripod, Remote Shutter Release Cable घेतली. चेतन ला आवाज दिला. तो तयार होताच. बुलेट ढकलून गेटच्या बाहेर काढली जेणे करून कोणी जागे होणार नाही.
बरोबर १२:३० ला नुब्राच्या त्या गोठवून टाकणाऱ्या निर्मनुष्य रस्त्यावरून १० किलोमीटर अंतरावरील Diskit Monastery ला निघालो. चेतन गाडी चालवत होता आणि मी मागे कुडकुडत बसलेलो. नागमोडी पण छान डांबरी रस्ता. मध्येच मऊ रेती लागायची. गाडी स्लो व्ह्यायची.
Diskit च्या जवळ आलो तशी गावातील कुत्री जागी झाली. थंडीपासून बचावासाठी त्यांच्या अंगावर असलेल्या भरमसाठ फर मुळे ती अधिकच मोठी आणि भयंकर दिसतात. तशी असतात खूप शांत आणि माणसाळलेली. छोट्याश्या टेकडीला U Turn घेत Monastery पर्यंत पोहोचलो तर साधारण ५०० मीटर अंतरावर गेट बंद होते. आता काय करायचं? कुत्री भुंकत आहेत. पूर्ण गाव शांत झोपलाय. जगातल्या काही मोजक्या उंच ठिकाणापैकी एका ठिकाणी रात्रीच्या १ वाजता आम्ही जीवघेण्या थंडीत कुडकुडत उभे आहोत. फक्त दोघे.
काही वेळा मूर्खपणा करावा. त्यात मज्जा असते. साहजिकच गटेच्या बाहेर गाडी उभी करून मी आणि चेतन चालत निघालो. कुत्री धावत आली. मागे वळलो. थोड्या वेळाने पुन्हा निघालो. कुत्री कदाचित थकली असावीत किंवा त्यांना आमचा मूर्खपणा आवडला असणार, ती फक्त भुंकत राहिली. आम्ही दूर जाईपर्यंत. त्यांचा कमी कमी होत जाणारा आवाज आणि मोठी मोठी होत चालेली गौतम बुद्धांची मूर्ती !! काय विलक्षण अनुभव होता.
पुढचा १ तास माझ्या आयुष्यातला काही मौल्यवान क्षणांपैकी एक होता. बुद्धं शरणं गच्चामि !!
रात्री १:३० वाजता Star Trail फोटो काढणारे जगात खूप लोक आहेत पण हि मूर्ती किती Star Trail फोटो मध्ये असेल?