अन्न, वस्त्र आणि निवारा !!
२९ एप्रिल. वेळ दुपारची ४ ची. रोइंग ह्या छोट्याश्या गावात दुपारचे जेवण घेवून आम्ही आराम करत होतो. ५६ किमी पुढे मायोदिया हे जवळपास ८००० फुटावर असलेलं अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे असं कळाल. अरुणाचलला ४.३० पासूनच मावळायला सुरुवात होते. अजून थोडा वेळ हातात होता. आम्ही मायोदिया च्या Forest Guest House चे बुकिंग मिळवले आणि साधारण ४.३० ला आम्ही तिकडे निघालो.
संपूर्ण ५६ किमी हा घाटरस्ता होता. अतिशय वळणावळणाचे अरुंद रस्ते. एका बाजूला खोल दरी तर दुसर्या बाजूला आभाळाला भिडलेले सुळके आणि त्यावरच किर्र जंगल. साधारण ४० किमी गेल्यावर हवेतील गारवा खूप वाढला आणि दूरवर डोंगराच्या माथ्यावर काळे ढग दिसू लागले. आम्ही ४५ किमी आलो असू आणि आता फक्त १०-१२ किमी अंतर बाकी होतं. अचानक रस्त्यात एक दगड-गोट्यांनी भरलेला अतिशय अवघड भाग लागला. खूप पाणी वाहून गेल्यामुळे जमीन जागोजागी खचली होती अन मोठे दगड गोटे वर आले होते. त्यावरून आमच्या गाड्या घसरत होत्या. मी कशीबशी गाडी बाहेर काढली अन पुढच्या वळणावर थांबलेल्या ६-७ गाड्यापाशी पोहचलो. आता आम्हाला जिथे पोहचायचे होतं ते ठिकाण काळ्या ढगांच्या आड दिसेनासे झाले होतं. काहीतरी विचित्र होतंय याची कल्पना आली आणि ज्यांनी ते अवघड वळण पार केलंय त्यांनी न थांबता लगेच पुढे व्हाव असं एकमताने ठरलं.
मी सर्वात पुढे निघालो. साधारण ५०० मीटर गेलो असेल तोच थोडा पाऊस सुरु झाला. गळ्यातला कॅमेरा आत ठेवला आणि पुढे निघालो. पुढच्या ३० सेकंदामध्ये पाऊस खूप वाढला. धुक्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे समोरच दिसेनासे झाले. हे इतकं अचानक घडलं कि काही सुचेना. माझ्या मागे असलेले सगळे पाऊस सुरु झाल्यावर रेनसूट घालायला थांबले आणि त्या वेळात मी बराच पुढे निघून आलो. आता मुसळधार पाऊस होता. माझे सगळे १९ मित्र २-३ किमी मागे होते आणि त्या किर्र अंधारात दरीचा अंदाज घेत मी गाडी चालवत होतो.
वाटल थांबव. १० सेकंद थांबलो तर समोरच रस्त्यावर एक दगड गडगडत आला. अश्या परिस्थितीत आपण पुढे गाडी चालवत जाणच योग्य आहे असं वाटल. एव्हाना रस्त्यावर अर्धा ते एक फूट पाणी वाहत होतं. ठिकठिकाणी माती आणि दगड घसरून रस्त्यावर आले होते. हेल्मेटच्या आत पाणी गेलं होतं आणि मी संपूर्ण ओला झालो होतो. फोटो नीट काढता यावेत म्हणून मी दिवसभर Riding Gloves घातले नव्हते त्यामुळे आता भिजून थंडीने हात कुडकुडत होते.
एका वळणावर JCB रस्त्याच्या कोपर्यावर उभा केलेला दिसला. वाटल त्याच्या कॅबिन मध्ये बसावे. गाडी लावली आणि कसेबसे त्यावर चढलो तर कळल त्याच कॅबीनच दार बंद होतं. अजून एक लक्ष्यात आलं कि ज्या अर्थी इथे JCB उभा आहे म्हणजे Landslides होत असणार. पटकन खाली उतरलो आणि परत पुढे निघालो.
आता १५-२० मिनिटे होवून गेली होती आणि पाऊस अजून वाढला होता. सगळ्या ग्रुप पासून पुढे एकटा असल्यामुळे भीती वाटत होती. काहीबाही विचार मनात येत होते. तितक्यात एक वळण आला आणि समोरच काहीच दिसेना. डोकं काम करायचं बंद झालं कारण रस्त्यावर एक धबधबा पूर्ण ताकदीने कोसळत होता. आता काय करावं? थोडा विचार केला आणि मन घट्ट करून गाडी त्या पाण्यातून घातली. १.५ सेकंद मध्ये तो धबधबा पार झाला पण त्या पाण्याचा मार हातावर बसला. अजून थंडी वाटू लागली. तश्यात पुढे निघालो.
एका वळणावर रस्ता सोडून १५० फुट खाली एक छोटं घर दिसलं. अंगात धीर आला. त्या अवघड रस्त्याने गाडी घेवून खाली आलो तर लक्ष्यात आलं हे सोडून दिलेलं घर आहे. गाडी उभी केली आणि तिच्या उजेडात दारातून आत जायला निघालो तर आतून घुरर्र्रर्र घुररर्र असा जोरात आवाज आला. आत १०-१५ मिथुन (गव्यासारखा प्राणी) दाटीवाटीत बसले होते. एकदम धस्स झालं. घराच्याच बाहेर पत्र्याखाली उभा राहिलो. आतून घुररर्र घुररर्र चालूच होती. ५ मिनिटानंतर एक कार दूरवरून येताना दिसली. लायट ऑन ऑफ करून त्याला थांबायला सांगितलं. ती कार थांबली. धावत वर आलो आणि कुठे राहायची जागा आहे का पुढे हे विचारलं. साधारण २५० मीटर पुढेच आम्ही बुक केललं Forest Guest House आहे असं कळलं आणि मी मनाच्या आकांताने पुढे निघालो.
तिथे पोहचलो तर रस्त्याच्या डाव्या बाजूला एका उतारावर छानसा बंगला होता. गाडी लावून ५० पायऱ्या चढून गेल्यावर कळलं तिथे कोणीच नाहीये आणि दाराला कुलूप लावलंय. अचानक पाऊस परत खूप वाढला. पुन्हा त्या निसरड्या पायऱ्यावरून खाली आलो. खूप जोरात “कोई हे क्या” असं २-३ वेळा ओरडलो आणि पुढे निघालो. १०० मीटरच गेलो आणि असं वाटल आता पर्यंत आपण सुरक्षित पोहचलो आहे. इथेच थांबव म्हणून परत फिरलो. आता मघाशी न दिसलेलं रस्त्याच्या उजव्या दरीच्या बाजूला असलेलं छोटंसं घर दिसलं. गाडी उभी करून खाली उतरून गेलो आणि दारावर आवाज दिला.
आत एक लायट लागली. एका तरुणाने दार उघडलं. रकतुम त्याच नाव. त्याचा अजून एक मित्र आत होता. मी महाराष्ट्रातून आलेला एक पर्यटक आहे आणि मला मदत हवी आहे, मी एवढंच बोललो. त्याने मला आत घेतलं. मी थंडीने लटलट कापत होतो. १०-१० ची ती छोटी खोली. आत मध्ये शेकोटी होती. ती त्याने पुन्हा पेटवली. मी अंगावरचे सगळे कपडे काढले आणि त्याने दिलेली रजई अंगाभोवती गुंडाळून शेकोटी भोवती बसलो. त्याने तो पर्यंत एक किटली शेकोटीवर ठेवली. सरजी लाल चाय पियेगा ना म्हणत त्याने त्या किटलीत साखर टाकली. मी त्याला मला थोडी रम मिळेल का विचारलं. इथे उंचीवर थंडी पासून वाचण्यासाठी सगळेच रम पितात. त्याने गरम पाण्यात मला रम दिली. थोडी स्वतः घेतली. एव्हाना अंगात थोडी उब आली होती. मी मोबाईल घेतला. कबीर आणि ऋचा च्या wallpaper वरच्या फोटो कडे बघितलं. डोळ्यात पाणी आलं. रकतुम ला दोघांचा फोटो दाखवला.
पुढे आर्मीचा एक बेस कॅम्प आहे हे कळलं पण तिथे फोन लागला नाही. मागे पडलेल्या मित्राबद्दल खूप काळजी वाटत होती आणि मी काही करूही शकत नाहीये ह्याची खंत वाटत होती. एक वेळ असं वाटलं कि बाकीचे वळून पाऊस सुरु झाल्याच्या ठिकाणापासून ५ किमीवर असलेल्या एका छोट्या गावात परत गेले असणार. म्हणजे सगळी रात्र मी इथे एकटा आणि ते एकत्र म्हणजे त्यांना माझी काळजी लागून राहणार. कुठे फोन लागण्याचा प्रश्नच नव्हता.
बर्याच वेळ रकतुम आणि त्याच्या मित्राचे त्यांच्या भाषेत काहीतरी बोलणं चालू होतं . Earthquake ह्या एका इंग्लिश शब्दांमुळे मला काहीतरी कल्पना आली. मी काय बोलताय असं विचारलं.
“सरजी, ४ दिन पहिले जब नेपाल में भूकंप आया तब उसके पहेले भी बारिश आयी थी. ३ दिन से यहा आर्मी ने भी भूकंप कि चेतावनी दी है. २ साल से हम ने इतनी बारीश नही देखी है.” – रकतुम बोलला.
मी स्वतःला सावरत मनाला समजावत त्याला बोललो “अरे नाही. और भूकंप हो भी गया तो हम यहा सेफ है. ये Guest House सेफ जगह पर ही होगा”.
ह्यावर रकतुम हसला आणि म्हणाला “सरजी सुभह पता चलेगा आपको कितने बडे पहाड के नीचे है हम अभी. अगर कुछ हो गया तो हम ही सबसे पहले जायेंगे”.
आम्ही शांत बसलो. कोणीच कोणाशी बोलेना. साधारण १ तासाने माझे बाकीचे मित्र आले. खूप आनंद झाला. सगळे सुखरूप होते आणि आता आम्ही परत सगळे एकत्र होतो. सगळे वर guest house चे कुलप तोडून आत गेले. मी आणि ४ मित्र इथेच रकतुम च्या खोलीत थांबलो.
पुढे रात्रभर पाऊस कोसळत होता. शेकोटीची लाकडे पुढे सरकत होती. रकतुम ने दिलेल्या रजईत उब आली होती. ती होती माणुसकीची उब आणि जगण्याच्या अनामिक ओढीची युगानुयुगे चालत आलेली उर्जा !!
Adveturous and thrilling
Rohan its was thrilling while reading. Your experience made it safer. I’m planning for July but hope you meet personally.